-
विपत्ती (Hazard)-
अत्यंत दुर्मिळपणे घडणारी किंवा अत्यंत टोकाची, नैसर्गिक अथवा मानवनिर्मित, अशी घटना की ज्यामुळे दुखापत होणे, मृत्यू ओढवणे तसेच मालमत्ता पर्यावरणाची हानी होऊ शकते.
-
असहायता (Vulnerability)-
अशी प्राप्त परिस्थिती की ज्यामुळे लोकांची आपत्तीपूर्व तयारी करण्याची वा आपत्तीला प्रतिसाद देण्याची क्षमता कमी होते. तसेच आपत्तीमुळे झालेली हानी सहन करण्याची वा नुकसान भरून काढण्याची क्षमता कमी होते.
-
क्षमता (Capacity)-
आपत्तीशी सामना करण्यासाठी, सज्ज राहण्यासाठी, निवारणासाठी वा त्या परिस्थितीतून त्वरित बाहेर येण्यासाठी म्हणून उपलब्ध असलेली संसाधने, साधने व ताकद म्हणजे क्षमता होय.
-
जोखीम (Risk)-
विशिष्ट कालावधी मध्ये प्रणाली, समाज किंवा समुदायामध्ये होऊ शकणारी जीवित हानी, इजा, मालमत्ता नष्ट किंवा खराब होण्याची संभाव्यता जी (Hazard), असहायता (Vulnerability), असुरक्षितता (Exposure) आणि क्षमता (Capacity) यांवरून निर्धारित केली जाते त्याला आपत्तीची जोखीम असे म्हणतात.
-
आपत्ती-
नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कारणांमुळे अथवा अपघातामुळे अथवा निष्काळजीपणामुळे उद्भवलेली कोणत्याही क्षेत्रातील मोठी दुर्घटना, संकट कि ज्या परिणामी मोठ्या प्रमाणात जीवित हानी किंवा मानवी नुकसान किंवा मालमत्तेची हानी किंवा नाश किंवा पर्यावरणाची हानी किंवा ऱ्हास होतो आणि जिचे स्वरूप किंवा व्याप्ती त्या बाधित क्षेत्रातील लोकांच्या तोंड देण्याच्या क्षमतेबाहेर असेल तेव्हा त्याला आपत्ती असे म्हणतात.
आपत्तीमुळे प्रभावित परिसरातील जनजीवन, मालमत्तेची आणि पर्यावरणाची हानी होते. एकूण समाजव्यवस्था, संपर्क, दळणवळण कोलमडून पडते व स्थानिक जनता या परिस्थितीचा मुकाबला करण्यास असमर्थ असते.
-
आपत्ती व्यवस्थापन-
आपत्ती व्यवस्थापन म्हणजे-
१) कोणत्याही आपत्तीचा धोका किंवा जोखीम यास प्रतिबंध घालणे.
२) कोणत्याही आपत्तीची जोखीम किंवा तिची तीव्रता किंवा परिणामकता सौम्य किंवा कमी करणे.
३) क्षमता वाढ करणे.
४) कोणत्याही आपत्तीवर कार्यवाही करण्यासाठी सज्ज राहणे.
५) कोणत्याही इशारा प्राप्त आपत्तीच्या परिस्थितीबाबत किंवा आपत्तीबाबत तात्काळ कृती करण्यासाठी कार्यक्षम होणे
६) कोणत्याही आपत्तीच्या परिणामांची तीव्रता किंवा व्याप्ती निर्धारित करणे.
७) बचाव व मदत कार्य हाती घेणे.
८) पुनर्वसन व पुनर्रचना करणे
यासाठी आवशयक असलेली नियोजन, संघटना, समन्वय, आणि अंमलबजावणी विषयक उपाययोजना याबाबतची अखंडित व एकात्मिकृत प्रक्रिया असा आहे.
-
आपत्तीची पूर्वतयारी (Disaster Preparedness) –
यामध्ये आपत्ती संभाव्यता जोखण्याची, तिला प्रतिसाद देण्याची व मुकाबला करण्याची क्षमता वाढवण्याच्या हेतूने केलेल्या उपक्रमांचा समावेश होतो. एखादी घटना आपत्तीजन्य ठरू शकते असे अनुमान काढून त्यादृष्टीने लोकांना आपत्तकाळात आणि नंतर काय करावे यासाठीच्या उपाययोजनांचा समावेशही यामध्ये होतो.
-
आपत्ती सौम्यीकरण (Disaster Mitigation)-
आपत्तीचा गाव, समाज आणि पर्यावरणावरील आघात आणि प्रभाव कमी करण्याच्या हेतूने आपत्तीच्या आधी केलेल्या उपाययोजनांचा या मध्ये समावेश होतो.
-
प्रतिबंधात्मक उपाययोजना (Disaster Prevention)-
आपत्तीपासून कायमस्वरूपी संरक्षण देणे किंवा विपत्तीचे आपत्तीत रूपांतर होणार नाही यासाठी त्याची तीव्रता/ वारंवारिता कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा या मध्ये समावेश होतो.
-
प्रतिसाद (Relief and Response)-
प्रतिसाद म्हणजे आपत्तीतून बचवलेल्या लोकांचा शोध घेणे, त्यांची सुटका करणे आणि त्यांच्या निवारा, पाणी, अन्न, आरोग्य सेवा इ. किमान गरजांची पूर्तता करणे.
-
पुनर्वसन (Rehabilitation)-
आपत्तीनंतर पीडितांना त्यांच्या घरांची दुरुस्ती किंवा पुर्नबांधणी साठी केलेले साहाय्य, पडझड झालेल्या अत्यावश्यक सेवा पुन्हा सुरु करणे, आर्थिक आणि सामाजिक व्यवहारांचे पुनरुज्जीविकरण यासाठीचा केलेल्या कृती आणि कार्यक्रमांचा या मध्ये समावेश होतो.
-
पुर्ननिर्माण (Reconstruction)-
यामध्ये पुनर्वसन आणि पुर्नबांधणी यांचा समावेश होतो. एखाद्या आपत्तीग्रस्त गावाने आपत्तीपूर्व स्थितीमध्ये आपले जनजीवन चालू करण्याची ही प्रकिया आहे.
-
आपत्ती जोखीम कमी करणे (Disaster risk reduction)-
आपत्ती जोखीम कमी करण्याचे उद्दिष्ट म्हणजे नवीन आपत्तींना होण्यापासून रोखणे, सध्या अस्तित्वात असणाऱ्या आपत्तींची जोखीम कमी करणे आणि आपत्ती जोखीम कमी करण्याचे उपाय करून देखील अस्तित्वात असणाऱ्या आपत्ती जोखीमांचे व्यवस्थापित करणे होय. हे सर्व Resilience मजबूत करण्यासाठी आणि शाश्वत विकास साध्य करण्यासाठी योगदान देतात.