सर्पदंश
सर्पदंश/साप चावणे- सामान्य खबरदारी
सर्पदंशाबाबत माहिती:
-
साप चावणे ही वैद्यकीय आपत्कालीन स्थिती आहे. वेळेवर उपचार न झाल्यास ते प्राणघातक ठरू शकते.
-
सर्व साप विषारी नसतात. अनेक साप शेतीतील किड नियंत्रित करण्यात मदत करतात.
-
सापांना मारण्याऐवजी त्यांचे सुरक्षित रेस्क्यू करण्याच्या पद्धतींना प्रोत्साहन द्यायला हवे.
-
बहुतांश सर्पदंश रात्री, शेतकाम करताना किंवा पावसाळ्यात होतात, त्यामुळे अश्या वेळी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.
-
साप प्रामुख्याने शेतात, लाकडाच्या ढिगाऱ्यांत, जोत्यांमध्ये, दगडाखाली, व पाणवठ्याजवळ लपतात. त्यामुळे अशा ठिकाणी काम करताना
सावधगिरी बाळगावी.
सर्पदंश टाळण्यासाठी खबरदारी:
-
शेतात काम करताना बूट व जाड कपडे घालावेत.
-
रात्री चालताना प्रकाशासाठी टॉर्चचा वापर करावा.
-
घराजवळील गवती झुडपे व जास्त वाढलेली गवत वेळोवेळी कापावी.
-
झोपायची जागा जमिनीपासून थोडी उंच ठेवावी व मच्छरदाणीचा वापर करावा.
-
लाकूड व इतर कचरा घरापासून दूर साठवावा.
-
कुटुंबातील सदस्यांना सर्पदंशानंतर काय करावे आणि काय करू नये हे शिकवावे.
-
सर्पदंशाबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती करावी.
-
सर्पदंशावरील औषध उपलब्ध असणारे आपल्या परिसरातील जवळचे वैद्यकीय केंद्र आणि तेथील संपर्क क्रमांक याबाबत माहित करून घ्या.
-
जवळच्या रुग्णालयाचे, अँब्युलन्स चालकाचे आणि सर्प मित्रांचे मोबाईल क्रमांक सेव्ह करून ठेवा.
सर्पदंश झाल्यास करावयाच्या गोष्टी (DOs):
-
शांत राहा. रुग्णाला धीर द्या व हालचाल टाळा. हालचालीमुळे विष लवकर शरीरात पसरते.
-
आपत्कालीन क्रमांकावर मदतीसाठी फोन करा. त्वरित वैद्यकीय मदत मिळवा. सर्पदंश ही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती आहे.
-
दंश झालेला भाग स्थिर ठेवा. चावलेला भाग हृदयाच्या पातळीखाली ठेवा व शक्यतो हलवू नका.
-
घट्ट वस्त्र/दागिने काढा: सूज येऊ शकते, म्हणून अंगावरचे दागिने किंवा घट्ट कपडे काढा.
-
सापाचे वर्णन लक्षात ठेवा. शक्य असल्यास, सापाचा रंग, आकार व रचना लक्षात ठेवा. हि माहिती सर्पमित्र आणि डॉक्टरांना उपयुक्त ठरते.
-
दंशाचा भाग स्वच्छ करा. स्वच्छ पाण्याने हळुवार धुवा. साबण किंवा अँटीसेप्टिक वापरू नका.
-
सैल पट्टी बांधून भाग स्थिर ठेवा.
-
सर्पदंश झालेल्या व्यक्तीसोबत राहून तिला धीर द्या. दंश झालेल्या व्यक्तीच्या श्वासोच्छ्वास व नाडीवर लक्ष ठेवा.
सर्पदंश झाल्यास करू नयेत अशा गोष्टी (DON’Ts):
-
घाबरू नका व सर्पदंश झालेल्या व्यक्तीला पळू देऊ नका. धावल्याने विष लवकर पसरते.
-
सर्पदंश झालेल्या ठिकाणी घट्ट पट्टी किंवा दाब देऊ नका. यामुळे रक्तप्रवाह बंद होतो व पेशींचे नुकसान होते.
-
जखम कापू नका किंवा विष शोषण्याचा प्रयत्न करू नका. या गोष्टी निष्फळ व धोकादायक आहेत.
-
बर्फ वापरू नका. त्यामुळे ऊतींचे नुकसान अधिक होते.
-
दारू, कॉफी किंवा औषधे देऊ नका. यामुळे उपचारात अडथळा येतो.
-
रुग्णालयात नेण्यात विलंब करू नका. लक्षणे सौम्य असली तरी तात्काळ वैद्यकीय मदत घ्या.
-
सापाला पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करू नका. हे अत्यंत धोकादायक आहे.
-
जादूटोणा किंवा घरगुती उपायांवर विश्वास ठेवू नका. मंत्र, घरगुती उपाय यामुळे वेळ वाया जातो. त्वरित रुग्णालयात पोहोचवा.