बंद

पूर परिस्थिती

पूर परिस्थिती- सामान्य खबरदारी

  • आपल्या जवळच्या परिसरात पूरसदृश्य परिस्थिती असताना पुराचे पाणी कुतूहलाने पाहण्यासाठी जाण्याचे आपत्ती पर्यटन (Disaster Tourism) करू नका.

  • पूरग्रस्त भागात वाहन चालवू नये. यामुळे वाहनाच्या नुकसानासहित पाण्यात बुडले जाऊन जीव जाण्याचा धोका असतो. पाण्याच्या प्रवाहामुळे आपण आणि वाहन त्वरीत वाहून जाऊ शकते.

  • प्रवासादरम्यान तुमच्या कारच्या आजूबाजूला पुराचे पाणी वाढत असल्यास, कार सोडून द्या आणि तुम्ही सुरक्षित ठिकाणावर जा.

  • प्रशासनाने प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रांवर/मध्ये प्रवेश करू नका. असे निर्बंध अपघात टाळण्यासाठी आणि आपला जीव वाचावा यासाठी केलेले असतात.

  • संभाव्य पूरपरिस्थिती असताना धोका असणाऱ्या जलस्रोतांजवळ भांडी घासणे, कपडे धुणे, जनावरांना नेणे, अंघोळीस जाणे, इ. टाळा. पाय घसरून अथवा तोल जाऊन पाण्यात बुडण्याची शक्यता असते

  • प्रशासनाने दिलेल्या माहिती व सूचनांचे पालन करा आणि कृपया अफवांना बळी पडू नका आणि अफवा पसरवू नका.

  • सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी कृपया सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा. पुराचे व अतिवृष्टीचे पाणी येण्याची वाट पाहू नये.

  • नागरिकांनी आपले ओळखपत्र, मौल्यवान वस्तू व महत्वाची कागदपत्रे प्राधान्याने सुरक्षित ठेवावी.

  • पूरग्रस्त इमारतीत प्रवेश करू नका. संबंधित प्रशासनाच्या विभागाला परिस्थितीची माहिती द्या आणि आवश्यक सहकार्य करा.

  • पुरामुळे साचलेल्या पाण्यात लहान मुलांना खेळू देऊ नका. दूषित पाण्यातून साथीचे आजार होण्याचा धोका असतो.

  • आपले घर आणि आजूबाजूच्या परिसरातील तुटलेले विद्युत खांब आणि तारा, तीक्ष्ण वस्तू आणि झालेली मोडतोड तपासा. आपले घर, दुकान आणि निवाऱ्याची इतर ठिकाणे सुरक्षित असल्याची खात्री करून घ्या.
    छत ओले असल्यास त्यापासून दूर राहा. घराचे छत आणि भिंती ओल्या झालेल्या असल्यास तात्काळ वीजपुरवठा बंद असल्याची खात्री करा.
    घरात लगेच विद्युत उपकरणांचा पूर्व तपासणी केल्याशिवाय वापर करू नका.

  • पुराच्या पाण्याच्या संपर्कात आलेले कोणतेही अन्न खाऊ नका. पुराच्या दूषित पाण्याचा वापर पिण्यासाठी तसेच इतर उपयोगसाठी करू नका. पिण्यासाठी स्वच्छ पाणी उकळून आणि निर्जंतुक करून वापरा.

  • विना चप्पल घरात प्रवेश करू नका. पुराच्या पाण्यासोबत वाहून आलेल्या तीक्ष्ण वस्तू तसेच सर्प, विंचू, विषारी किटक वाहून आले असल्यास त्यानुसार खबरदारी बाळगा.
    पूर ओसरल्यावर आपले घर आणि वस्तू स्वच्छ आणि निर्जंतुक करून घ्या. गॅस कनेक्शन मधून गळती होत नसल्याची खात्री करून घ्या. घरात प्रवेश केल्यावर सावधानता बाळगा, धुम्रपान करू नका किंवा मेणबत्त्या, कंदील किंवा तात्काळ आग पेटवू नका.

  • कृपया आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.

मासेमारी आणि जलवाहतूक करताना-

  • मासेमारी तसेच जलवाहतूक करणाऱ्या डोंगेवाहक बांधवांनी मासेमारी तसेच जलवाहतुकीसाठी जाताना आवश्यक प्रतिबंधात्मक उपायांची दक्षता घ्यावी (जसे कि लाईफजॅकेट आवश्य घालणे,
    बोटी/डोंग्याची पूर्व तपासणी करणे आणि चालवण्यासाठी सुरक्षित आहे ह्याची खात्री करणे, इ.)

  • मासेमारी तसेच जलवाहतुकीसाठी जाताना हवामानाची सद्यस्थिती, पाऊस आणि पूर संबंधित धोक्याच्या सूचना आणि इशारे तपासणे आणि अशी अद्यावत माहिती
    देणाऱ्या यंत्रणांच्या सतत संपर्कात राहणे.

  • बोटी/डोंग्याच्या क्षमतेपेक्षा जास्त वजन आणि व्यक्तींना बोट/डोंग्यात बसवू नये.

  • अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याचे किंवा लाटांची वाढीव हालचाल जाणवल्यास त्वरित किनाऱ्याकडे सुरक्षित जावे.

पाण्याच्या ठिकाणी आणि नजीकच्या पर्यटन स्थळांवर जाताना-

  • पाण्याच्या ठिकाणी जाताना किंवा कौटुंबिक सहलीचे नियोजन करताना हवामानाची सद्यस्थिती, पाऊस आणि पूर संबंधित धोक्याच्या सूचना आणि इशारे तपासणे
    आणि अशी अद्यावत माहिती देणाऱ्या यंत्रणांच्या सतत संपर्कात राहणे.

  • पाण्याच्या ठिकाणाजवळ असल्यास मित्र आणि कुटुंबातील सदस्यांवर (विशेषतः लहान मुले) बारकाईने लक्ष ठेवा.

  • पाण्यात जाण्यापूर्वी अल्कोहोल किंवा अमली पदार्थांचे सेवन करू नये.

  • पर्यटन स्थळी बोटींग करताना लाईफजॅकेट आवश्य घालणे.

  • जलतरण तलावात प्रवेश करण्यापूर्वी त्याची खोली आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय पाहूनच पोहण्यासाठी उतरावे. प्रशिक्षण घेत असलेल्या व्यक्तींनी आपल्या
    प्रशिक्षकांच्या निगराणीतच तलावात उतरावे. जलतरण तलाव चालकांनी आवश्यक असल्यास वयानुसार विशिष्ट जागी प्रवेश प्रतिबंधित असल्याची खात्री करणे

  • बोटीतून विहार करताना बोटीच्या क्षमतेपेक्षा जास्त व्यक्तींनी त्यात प्रवेश करू नये.

  • बोटीतून प्रवास करताना दक्ष आणि जबाबदार वर्तवणूक करावी. अनागोंदी गोंधळ, मस्ती आणि अनावश्यक हालचाल टाळावी. यामुळे आपला तसेच आपल्या सह
    प्रवाश्यांचा बोट/ होडी बुडून मृत्यू होऊ शकतो.

  • शक्य असल्यास पाण्यात जाणे टाळा कारण किनाऱ्यावरून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह आणि खोलीचा अंदाज बांधला जाऊ शकत नाही.

  • पाण्याच्या ठिकाणी पर्यटनासाठी गेल्यावर जलस्रोतांच्या जवळ जाऊन सेल्फी आणि फोटो काढणे टाळा.

  • जलस्रोतांच्या जवळील धबधब्याखाली उभे राहणे टाळा. प्रवाहासोबत अचानक वाहत येणाऱ्या दगड तसेच तुटलेल्या झाडाच्या फांद्यांमुळे शरीरावर आघात होऊन व्यक्ती
    प्रवाहात वाहून जाण्याचा,जखमी किंवा मृत्युमुखी होण्याचा धोका असतो.

  • पोहायला येणाऱ्या व्यक्तींना देखील पाण्याचा प्रवाह आणि खोली चा अंदाज न आल्याने वाहून जाण्याचा धोका असतो. त्यामुळे पुराचे पाणी तसेच अनोळखी जलस्रोतात
    पोहण्याचा मोह टाळावा.

  • अश्या ठिकाणी कोणी व्यक्ती बुडत असताना पोहायला येत नसणाऱ्या व्यक्तीने पाण्यात त्यांचा जीव वाचवण्यासाठी अंदाज न घेता उडी मारणे टाळावे. अश्या वेळी
    तात्काळ मदत यंत्रणांना संपर्क करून घटनेची योग्य माहिती द्यावी. मदत येई पर्यंत धोकाविरहित बचावाचे प्रयत्न करावे.

  • पोहायला येणाऱ्या व्यक्तीनेही पाण्याचा तर्कशुद्ध अंदाज घेऊनच पाण्यात बचावासाठी उडीचे धाडस करावे. परिस्थितीचा अंदाज घेऊन तात्काळ मदत यंत्रणांना संपर्क
    करून घटनेची योग्य माहिती द्यावी.