बंद

वीज कोसळणे

वीज कोसळणे- सामान्य खबरदारी

  • विजेचा प्रकाश आणि आवाज यात जर ३० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी अंतर असेल तर आसपासच्या ५ किलोमीटर च्या अंतरात
    वीज पडत असण्याची शक्यता असल्याने तुम्हाला विजेपासून अधिक धोका असू शकतो.
  • मैदान, शेत सारख्या मोकळ्या जागी आपण असाल आणि आजूबाजूला तुमच्यापेक्षा उंच काहीही नसेल तर ताबडतोब आडोशाला जा.
  • रस्त्याच्या बाजूला असणारे एकटेच झाड, खांब, मनोरा (Tower), पत्राचे/ धातूचे बसस्टॉप अथवा टपऱ्या असुरक्षित असू शकतात, त्यामुळे तेथे आसरा घेऊ नका.
  • विजेचे सुवाहक असणाऱ्या गोष्टी जसे कि उंच झाडे, विजेचे खांब, जलस्रोत, इ. खाली किंवा जवळ आसरा घेऊ नका.
  • आपण डोंगर अथवा टेकडी वर असाल तर लगेच खाली उतरा.
  • स्विमिंग पूल, तलाव, समुद्र, इ. यांसारख्या पाण्याच्या कोणत्याही मोठ्या साठ्यापासून शक्य तेवढे लांब जा.
  • रबरी बूट व हातमोजे घातल्याने वीज पडण्यापासून आपल्याला कोणतेही संरक्षण मिळत नाही हे लक्षात ठेवा.
  • जवळ कुठलीही धातूची वस्तू जसे कि छत्री, विळा, फावडे आणि इतर धातूचे शेतीसाहित्य सोबत बाळगू नये.
  • वीज पडतांना वीजप्रवाह जमिनीत जात असल्याने जमिनीसोबत कमीत कमी संपर्क असणे महत्वाचे असल्याने जमिनीवर झोपू नका.
  • वीज पडण्याच्या आवाजामुळे बहिरेपणा येऊ शकतो त्यामुळे कान हातांनी झाका.
  • सुरक्षित इमारतीत आसरा घ्या.
  • वीज पडण्याची शक्यता असताना सुरक्षित जागा मिळत नसेल तर गुढग्यातून वाकून दोन पायावर बसावे आणि मान गुढग्याजवळ वाकवत कानावर आत ठेऊन सावध राहावे.
    आजूबाजूला काही सुरक्षित जागा नसताना झाडापासून त्याच्या उंचीच्या दुप्पट अंतरावर राहावे.
  • विशेषतः-वीज पडून शेतात काम करणाऱ्या लोकांचे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे वादळी परिस्थितीकडे दुर्लक्ष न करता शेतकरी, शेतमजूर, पशुपालक यांनी शेती तसेच खुल्या मैदानात काम करत न राहता तात्काळ सुरक्षित ठिकाणी जावे.
    वीज पडत असतांना पशुपालकांनी आपल्या गुरांसह झाडाखाली आसरा घेऊ नये.

घरात असताना-

  • वादळी वारा आणि विजा चमकत असताना शक्यतो सुरक्षित घरातच राहा.
  • फक्त घरात राहिल्याने वीज कोसळण्यापासून सुरक्षित असल्याची खात्री होऊ शकत नाही त्यामुळे इतर आवश्यक गोष्टींची देखील काळजी घ्या.
  • घराची बाल्कनी, अंगण आणि छतावर उभे न राहता तात्काळ घरात जा. घराच्या खिडक्या आणि दारे बंद ठेवा.
  • घरात खिडक्यांच्या जवळ उभे न राहाता शक्यतो खोलीच्या मध्यभागी रहा. विजेच्या आवाजाने खिडक्यांच्या काचा फुटण्याची शक्यता असते.
  • वीज चमकत असताना कोणतेही विद्युत तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणे जसे कि मोबाईल, फ्रिज, मिक्सर, AC, टीव्ही, इ. बंद करा. हाताळू नका.
  • मोबाईल फोन चार्जिंगला लावू नका. मोबाइल, वायर फोन किंवा कॉर्डलेस फोन वर बोलू नका. आपत्कालीन परिस्थिती साठी मोबाइल फोन ची बॅटरी जपून ठेवा. शक्य असल्यास SMS द्वारे संपर्कात राहा.
  • पाण्याची पाइपलाइन मध्ये विद्युत प्रवाह होऊ शकतो त्यामुळे अशा वेळी नळाखाली हात, कपडे, भांडे धुवू नका. शॉवर ने अंघोळ करू नका.
  • पाळीव प्राणी बाहेर असल्यास त्यांना देखील आत सुरक्षित ठिकाणी आणा.
  • विजेचा शेवटचा गडगडाट ऐकल्यानंतर कमीत कमी ३० मिनिटांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडू शकतो.

गाडीमध्ये असताना-

  • आपण जर गाडीमध्ये असाल आणि इतर कुठल्या सुरक्षित ठिकाणी जाणे शक्य नसेल तर काचा आणि इंजिन बंद करून गाडीमध्येच थांबा.
    गाडीत कोणत्याही धातूला स्पर्श करू नका.
  • जर रिक्षा किंवा कापडी छताच्या इतर वाहनात तुम्ही असाल तर त्यातून लगेच बाहेर पडा आणि सुरक्षित इमारतीत आसरा घ्या.

विजेच्या आघातामुळे होणाऱ्या दुखापतीची चिन्हे आणि लक्षणे-

त्वचा जळणे, ऐकू न येणे, डोळ्यांना दिसणे बंद होणे, श्वास घेण्यास अडचण, अनियमित हृदयाचे ठोके, छाती दुखणे, डोके दुखणे,
जागे राहण्यात अडचण होणे, गोंधळ होणे, भ्रम वाटणे, चक्कर येणे, स्नायूंचे दुखणे, अशक्तपणा, तात्पुरता अर्धांगवायू, कोसळणे, नाडी
मंद हळू होणे किंवा बंद पडणे, हृदयविकाराचा झटका, इ.

उपचार करताना-

  • वीज पडल्याने व्यक्ती भाजणे, शारीरिक इजा, बेशुद्ध होणे यासारखे आघात होऊ शकतात. अशा व्यक्तीला तात्काळ वैद्यकीय उपचार आवश्यक आहे.
  • आवश्यकतेनुसार १०८ क्रमांकावर रुग्णवाहिकेची संपर्क करा. शक्य असल्यास तात्काळ जवळच्या रुग्णालयात घेऊन जा.
  • रुग्णवाहिका येई पर्यंत व्यक्तीला तात्काळ प्रथमोपचार देण्याचा प्रयत्न करा.
  • विजेचा आघात झालेल्या व्यक्तीवर कोणताही विद्युत भर नसतो त्यामुळे अश्या कोणत्याही रुग्णाला मदत करताना आपल्याला विद्युत धक्का बसेल असा गैरसमज बाळगून घाबरून जाऊ नये.
  • वीज पडलेल्या ठिकाणी पुन्हा वीज पडू शकते त्यामुळे विजेने आघात झालेल्या व्यक्तीला सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे.
  • विजेचा आघात झालेली व्यक्ती जर बेशुद्ध असेल तर त्यांना जमिनीवर झोपवताना डोक्याचा भाग तळपायाच्या बोटांपेक्षा खालील बाजूला/कमी उंचीवर ठेवा.
  • जर असा रुग्ण श्वास घेत नसेल परंतु त्याची नाडी जाणवत असेल तर त्याला कृत्रिम श्वासोच्छवास द्या.
  • विजेचा आघात झालेली व्यक्ती जर श्वास घेत असेल आणि त्यांची नाडी चालू असेल तर अशा व्यक्तीला भाजणे, बहिरेपणा, आंधळेपणा,
    हाडमोड अशी काही शारीरिक इजा झाली आहे कि नाही ते तात्काळ तपासून पहा.